सोशल मीडियावर जनगणनेचा व्हायरल होणारा तो मेसेज बनावट
खातरजमा करण्याचे प्रशासनाचे आवाहन

सोशल मीडियावर जनगणनेचा व्हायरल होणारा तो मेसेज बनावट ; खातरजमा करण्याचे प्रशासनाचे आवाहन
मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

सध्या सोशल मीडियावर ‘जनगणना २०२७’ च्या नावाखाली एक माहितीचा अर्ज आणि काही लिंक्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, हा अर्ज पूर्णपणे बनावट आणि अनधिकृत असून, नागरिकांनी अशा कोणत्याही अर्जावर आपली खासगी माहिती देऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. इंटरनेटवर पसरणाऱ्या अशा खोट्या संदेशांमुळे नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याने राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) याबाबतचा फॅक्ट चेक प्रसिद्ध केला आहे.
देशाच्या १६ व्या जनगणनेचा पहिला टप्पा लवकरच सुरू होत आहे. डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या जनगणनेत नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी शासनाने केवळ दोनच अधिकृत मार्ग निश्चित केले आहेत. याव्यतिरिक्त तिसऱ्या कोणत्याही मार्गाने माहिती गोळा केली जात नाही.
अशी करा अधिकृत नोंदणी
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ३३ महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी नागरिक ‘स्व-नोंदणी’ (Self Enumeration) करू शकतात. यासाठी केंद्र सरकारने https://se.census.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर माहिती भरल्यानंतर नागरिकांना एक ‘SE ID’ मिळेल. हा आयडी जपून ठेवणे आवश्यक आहे, कारण जेव्हा अधिकृत प्रगणक तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दाखवून माहितीची पडताळणी करता येईल.
प्रगणक देणार तुमच्या घरी भेट
ज्या नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत अधिकृत प्रगणक स्वतः घरी येऊन माहिती घेणार आहेत. या कालावधीत येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवूनच त्यांना माहिती द्यावी. नोंदणीचा हा थेट आणि सुरक्षित मार्ग आहे.
सध्या व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत पीडीएफ फाईल्स किंवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका. तुमची वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याची भीती असते. त्यामुळे केवळ अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करावा आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.



