मे अखेरपर्यंत नालेसफाई पूर्ण करा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आदेश
निवारा केंद्रांत सर्व सोयीसुविधांचे निर्देश

- मे अखेरपर्यंत नालेसफाई पूर्ण करा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आदेश
कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पावसाळा आणि पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मे अखेरपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करून त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
संभाव्य पूरबाधित गावांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने आतापासूनच पावले उचलली आहेत. या गावांसाठी निश्चित करण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि स्नागृहांची चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा वेळेत नियोजन करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला असून, कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होऊ नये, हाच प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी बैठकीत ठणकावून सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता १६ प्रमुख नद्या आणि सुमारे ९१ टीएमसी साठवण क्षमता असलेली ६० धरणे जिल्ह्यात आहेत. या पार्श्वभूमीवर, ज्या सात मोठ्या धरणांना दरवाजे आहेत, त्यांची तांत्रिक तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करण्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेने सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून धोकादायक ठरणाऱ्या शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारतींबाबत तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी धोकादायक इमारती आणि झाडांबाबत विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून कडक कारवाई करावी, जेणेकरून पावसाळ्यात कोणतेही अपघात होणार नाहीत. पावसाळ्याच्या काळात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला मुख्यालय सोडता येणार नाही तसेच रजाही घेता येणार नाहीत, असा कडक इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
रस्ते दुरुस्ती आणि झाडांच्या फांद्या काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने मे अखेरची डेडलाईन पाळावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पूरबाधित क्षेत्रातील कुटुंबांना स्थलांतराची वेळ आल्यास त्यांनी नेमक्या कोणत्या निवारा केंद्रात जायचे आहे, याची पूर्वकल्पना देण्याचे आदेशही त्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात १०० टक्के ‘उद्घोषणा यंत्रणा’ कार्यान्वित करून प्रत्येक गावाने आपले आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत ठेवावेत, असेही डॉ. राठोड यांनी बैठकीच्या शेवटी निर्देशित केले.



