आपला जिल्हाताज्या घडामोडी

कोल्हापुरात बकरईद उत्साहात; मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर नमाज पठण

सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश

कोल्हापुरात बकरईद उत्साहात; मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर नमाज पठण

​कोल्हापूर:एन. वाय. नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर शहरात आज गुरुवार, दिनांक २८ मे २०२६ रोजी ‘बकरईद’ म्हणजेच ‘ईदुल अजहा’ हा सण अत्यंत उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील दसरा चौक परिसरातील मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज पठण केले. या पवित्र दिनी कोल्हापूरच्या एकतेचे दर्शन घडवत , सर्वधर्मीय बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

​मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर नमाज पठणासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी तीन टप्प्यांत नमाज पार पडला. पहिल्या जमातीसाठी मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि नमाज पठण केले. त्यानंतरच्या दुसऱ्या जमातीसाठी हाफीज मोहम्मद जैद मुल्ला, तर तिसऱ्या जमातीसाठी मौलाना रहमतुल्ला कोकणे यांनी नमाजचे नेतृत्व केले.

​या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मुस्लिम बांधवच नव्हे, तर सर्वधर्मीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून कोल्हापूरची आणि देशाची एकात्मता, तसेच सुखा-शांती अबाधित राहावी अशी प्रार्थना केली. सणानिमित्त उपस्थितांचे स्वागत मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादरभाई मलवारी यांनी केले.

​या सोहळ्याला उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी डी.वाय.एस.पी. प्रिया पाटील, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कणेरकर, नगरसेवक अमर समर्थ, रापू लारकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, नासिर धारवाडकर, ताज मुल्लाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी मानले.

​यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदील फरास आणि संचालक मंडळ – हाजी पापाभाई बागवान, हाजी लियाकत मुजावर, हाजी जहांगीर अत्तार, रफीक शेख, रफीक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांनी उपस्थित पाहुण्यांना शिरखुरम्याचा आस्वाद देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहराच्या विविध भागातून तसेच मशिदींमधूनही मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांना गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरकरांनी नेहमीप्रमाणेच या सणाद्वारेही सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??