जागतिक वारसा असलेल्या हिमालयाच्या ‘फुलांच्या दरी’चे दरवाजे पर्यटकांसाठी खुले
निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बातमी

निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बातमी: जागतिक वारसा असलेल्या हिमालयाच्या ‘फुलांच्या दरी’चे दरवाजे पर्यटकांसाठी खुले
विशेष प्रतिनिधी: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
चमोली: हिमालयाच्या कुशीत वसलेल्या आणि जगभरातील निसर्गप्रेमींचे आकर्षण असलेल्या उत्तराखंडमधील प्रसिद्ध ‘फुलांच्या दरी’चे (व्हॅली ऑफ फ्लॉवर्स) दरवाजे यंदाच्या पर्यटन हंगामासाठी १ जूनपासून पर्यकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले आहेत. दरवर्षी हिवाळ्यातील प्रचंड बर्फवृष्टीमुळे हे राष्ट्रीय उद्यान काही महिन्यांसाठी बंद ठेवले जाते, मात्र आता बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्याने आणि निसर्गाचे सौंदर्य बहरण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा पर्यटकांना या निसर्गस्वर्गाची अनुभूती घेता येणार आहे.
समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर स्थित असलेली ही दरी नंदादेवी जैवमंडल राखीव क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या या दरीत पाचशेहून अधिक प्रकारची दुर्मिळ वनफुले आणि औषधी वनस्पती आढळतात. पावसाळ्याच्या आगमनानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ही दरी विविध रंगांच्या फुलांनी एखाद्या रंगीबेरंगी चादरीसारखी नटते, त्यामुळे या काळात दरीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
ही दरी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चमोली जिल्ह्यातील गोविंदघाटपर्यंत वाहनाने प्रवास करावा लागतो. तेथून पुढे पुलना गावापर्यंत गाडीने जाऊन त्यानंतर सुमारे दहा किलोमीटरचा पायी प्रवास करून घांगरिया या बेस कॅम्पपर्यंत पोहोचावे लागते. घांगरियापासून दरीचा मुख्य भाग केवळ तीन ते चार किलोमीटर अंतरावर असून, तिथे पोहोचण्यासाठी वन विभागाच्या तपासा नाक्यावर प्रवेश शुल्क भरून अधिकृत परवानगी घेणे अनिवार्य आहे. दरीमध्ये राहण्याची सोय नसल्याने पर्यटकांना घांगरियामध्ये मुक्काम करून सकाळी दरीत प्रवेश करावा लागतो आणि सायंकाळपर्यंत परतणे बंधनकारक असते.
यंदाच्या हंगामात निसर्गप्रेमींसह छायाचित्रकार आणि अभ्यासकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः ज्यांना हिमालयातील जैवविविधता आणि दुर्मीळ प्रजातींचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी हा काळ पर्वणीचा ठरणार आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दरीमध्ये प्लास्टिक नेण्यास सक्त मनाई असून पर्यटकांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे, धबधबे आणि विविध रंगांत फुललेल्या फुलांच्या दरीमुळे हे ठिकाण पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान टिकवून आहे. १ जूनपासून सुरू झालेला हा हंगाम साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहणार असून, यंदाच्या हंगामामुळे येथील स्थानिक पर्यटन व्यवसायालाही मोठी उभारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



