कृषी व व्यापारताज्या घडामोडीदेश विदेश

घरगुती सिलिंडरच्या दरवाढीचा भडका ; सिलिंडरच्या दरात तब्बल २९ रुपयांची वाढ

गृहिणींचे बजेट कोलमडले

घरगुती सिलिंडरच्या दरवाढीचा भडका ; सिलिंडरच्या दरात तब्बल २९ रुपयांची वाढ . 

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किमतींचा थेट फटका आता सर्वसामान्य करवीरकरांच्या स्वयंपाकघराला बसला आहे. देशातील तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरात तब्बल २९ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. हे नवे दर आज रविवार, ७ जून २०२६ पासून लागू झाले आहेत. त्यामुळे ऐन महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

​या नवीन दरवाढीनंतर कोल्हापूर शहरात १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आता ९४४ रुपये ५० पैशांवर पोहोचली आहे. कालपर्यंत कोल्हापूरकरांना याच सिलिंडरसाठी ९१५ रुपये ५० पैसे मोजावे लागत होते, त्यात आता थेट २९ रुपयांची वाढ झाली आहे. स्थानिक कर आणि वाहतूक खर्चामुळे वेगवेगळ्या शहरांनुसार ही किंमत थोडीफार बदलत असली, तरी कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात आजपासून ग्राहकांना गॅस रिफिल करताना ही नवीन वाढीव रक्कम द्यावी लागणार आहे.

​गेल्या काही दिवसांतील दरवाढीचा आढावा घेतला, तर सर्वसामान्यांचे कंबरडे कसे मोडले आहे हे स्पष्ट होते. तेल कंपन्यांनी गेल्या तीन महिन्यांत केलेली ही दुसरी मोठी वाढ आहे.

​यापूर्वी ७ मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत एकाच वेळी ६० रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ७ जून रोजी २९ रुपयांचा भार ग्राहकांवर टाकण्यात आला आहे. याचाच अर्थ अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत घरगुती गॅस सिलिंडर तब्बल ८९ रुपयांनी महागला आहे. मार्च महिन्यापूर्वी असणारे दर आणि आताचे दर यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.

​केवळ गॅस सिलिंडरच नाही, तर मे महिन्याच्या मध्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही प्रतिलिटर साडेसात रुपयांची वाढ झाली आहे, तर सीएनजी गॅस देखील प्रति किलो ६ रुपयांनी महागला आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून  सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे महिन्याचे गणित पुरते बिघडले आहे.                       

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तेल कंपन्यांच्या सूत्रांनुसार, सध्याच्या घडीला प्रत्येक घरगुती सिलिंडरवर कंपन्यांना अजूनही मोठे नुकसान सोसावे लागत आहे. जागतिक बाजारपेठेतील सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राईसचा विचार केला, तर प्रत्यक्षात या सिलिंडरची किंमत १६०० रुपयांच्या पुढे असायला हवी होती, मात्र सरकार आणि कंपन्यांनी भार उचलल्यामुळे हा दर ९०० च्या घरात रोखण्यात यश आले आहे, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

​मात्र, प्रशासनाचा हा दावा काहीही असला, तरी प्रत्यक्षात  गृहिणींचे बजेट मात्र या २९ रुपयांच्या वाढीमुळे पुरते कोलमडले आहे. आधीच भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर चढे असताना आता गॅसची ही नवी दरवाढ सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी करणारी ठरणार आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??