कृषी व व्यापारताज्या घडामोडीदेश विदेश

E20 मुळे वाहन खराब झाल्याचे एकतरी उदाहरण दाखवा नितीन गडकरींचा सवाल. 

E20 मुळे वाहन खराब झाल्याचे एकतरी उदाहरण दाखवा’ इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत नितीन गडकरींचा सवाल. 

नवी दिल्ली: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

देशात २० टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या (E20) वापरावरून सुरू असलेल्या तांत्रिक चर्चा आणि शंकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या हरित इंधनाचा जोरदार पुरस्कार केला. देशात E20 पेट्रोलमुळे कोणत्याही वाहनाच्या इंजिनचे नुकसान झाल्याचे एकही अधिकृत उदाहरण समोर आलेले नाही, असे सांगत त्यांनी या इंधनाची सुरक्षितता अधोरेखित केली.

​गेल्या काही दिवसांपासून वाहन चालक आणि काही तांत्रिक वर्तुळात E20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या किंवा जुन्या गाड्यांच्या इंजिनवर विपरीत परिणाम होत असल्याच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर बोलताना गडकरी म्हणाले कि, ग्राहकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. E20 पेट्रोलमुळे इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा एकही ठोस दाखला उपलब्ध नाही. जर कोणाकडे अशी वास्तविक तक्रार असेल, तर त्यांनी थेट पुरावा सादर करावा. तांत्रिकदृष्ट्या हे इंधन वाहनांसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​भारताच्या इंधन धोरणाचे समर्थन करताना केंद्रीय मंत्र्यांनी देशाच्या आर्थिक गणितावर प्रकाश टाकला. भारत दरवर्षी सुमारे २२ लाख कोटी रुपये केवळ कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च करतो, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील प्रचंड मोठा बोजा कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी इथेनॉलसारख्या स्वदेशी पर्यायांचा स्वीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. ब्राझीलसारख्या देशात २७ टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे यशस्वी मिश्रण केले जाते आणि तिथेही जागतिक दर्जाची वाहने विनासायास धावतात, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

​सरकारचे हे धोरण कोणत्याही विशिष्ट व्यावसायिक नफ्यासाठी नसून, देशातील शेती क्षेत्राला आणि बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवले जात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. कच्च्या तेलाची आयात कमी झाल्यास देशाचा पैसा देशातच राहील आणि त्याचा थेट फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​इथेनॉल निर्मितीमुळे देशातील शेतकऱ्यांना मिळालेल्या आर्थिक फायद्याची आकडेवारी त्यांनी यावेळी जाहीर केली. आधी केवळ उसाच्या रसापासून इथेनॉल बनवले जात होते, पण आता मका, तुटलेला तांदूळ आणि बांबू यांपासूनही त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मक्यापासून इथेनॉल बनवण्याच्या निर्णयामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना ४५ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. पूर्वी मक्याचा बाजारभाव प्रति क्विंटल १,२०० रुपये होता, तो आता २,८०० रुपयांवर पोहोचला असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

​भविष्यात भारत फ्लेक्स-इंजिन आणि १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या देशाने वेगाने वाटचाल करत असल्याची माहिती गडकरींनी दिली. तसेच, आगामी काळात केवळ पाण्याचा वापर करून हायड्रोजन तयार करण्याचे आणि त्यावर सार्वजनिक वाहतुकीच्या बस चालवण्याचे प्रगत तंत्रज्ञान देशात आणले जाईल, असे सांगत त्यांनी प्रदूषणमुक्त प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??