आपला जिल्हाताज्या घडामोडी

शिरोळ तालुक्यात महापुराच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणा सज्ज३ महिने पुरेल इतका औषध साठा उपलब्ध

शिरोळ तालुक्यात महापुराच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणा सज्ज३ महिने पुरेल इतका औषध साठा उपलब्ध

जयसिंगपूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शिरोळ तालुक्यात संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तालुका वैद्यकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. तालुक्यात पुढील ३ महिने पुरेल इतका मुबलक औषध साठा उपलब्ध करण्यात आला असून, पूरप्रवण क्षेत्र असलेल्या कवठेगुलंद, सैनिक टाकळी व शिरोळ या ठिकाणी अतिरिक्त औषधांचा साठा तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी दिली.

शिरोळ तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तालुक्यात तब्बल ४२ वैद्यकीय पथके स्थापन करण्यात आली आहेत. तालुक्यात कवठेगुलंद, घालवाड, नृसिंहवाडी, सैनिक टाकळी, अब्दुललाट, दानोळी, नांदणी व जयसिंगपूर अशा ८ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ३३ उपकेंद्रे कार्यरत आहेत. या सर्वच केंद्रांवर औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. विशेषतः पावसाळ्यात उद्भवणारा सर्पदंश आणि भटक्या कुत्र्यांचे चावे यावर लागणारी आवश्यक औषधे व लसी देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १६ डॉक्टरांची आवश्यकता असताना सध्यातरी ८ डॉक्टर कार्यरत असून ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

तालुक्यात काही बोगस डॉक्टरांनी आपला खाजगी व्यवसाय सुरू केला होता. यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय विभागाने त्यांची खातरजमा करत त्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्यास सक्त मनाई केली आहे, अशी माहिती डॉ. खटावकर यांनी दिली. तसेच, पुराच्या काळानंतर पसरणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी प्रत्येक गावात औषध फवारणी यंत्रे (मशीन) सज्ज ठेवण्यात आली आहेत. संपूर्ण वैद्यकीय पथक महापुराचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी अहोरात्र सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??