पन्हाळ्याच्या पायथ्याशी आढळला बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह

पन्हाळ्याच्या पायथ्याशी आढळला बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह
पन्हाळा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
पन्हाळगडाच्या पायथ्याशी आपटीजवळ सोमवार पेठेत भरवस्तीत एका घराच्या बांधकामाच्या ठिकाणी आज सकाळी बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती मिळताच वन विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नर बिबट्याच्या हल्ल्यात बछड्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालात वर्तविली आहे, असे वन विभागाने सांगितले.
याबाबत वन विभागाने दिलेली माहिती अशी आपटीपैकी सोमवार पेठ येथील विलास शामराव गायकवाड यांना बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. हा बछडा मादी जातीचा एक ते दीड वर्षांचा होता. वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पन्हाळ्यावर हलवला. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी शवविच्छेदन केले. यावेळी सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, परिक्षेत्र वनाधिकारी (पन्हाळा) अजित माळी उपस्थित होते. शवविच्छेदनाच्या अहवालात बछड्यावर नर बिबट्याने हल्ला केला असावा, त्याने बछड्याच्या गळ्याला चावा घेतल्यामुळे रक्तस्त्राव झाला व श्वसन बंद पडल्याने मृत्यू झाला, असे नमूद आहे. वन विभागाने परिसरातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर पटकारे, वनरक्षक संदीप पाटील, पन्हाळ्याचे वन्यजीव बचाव पथक या कार्यवाहीत सहभागी होते.


