क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

भारताची जोरदार रंगपंचमी; न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय

अहमदाबादमध्ये भारताने उंचावला तिसरा टी-२० विश्वचषक  🏆 

 भारताची जोरदार रंगपंचमी; न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय; अहमदाबादमध्ये भारताने उंचावला तिसरा टी-२० विश्वचषक  🏆 

अहमदाबाद :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवत विश्वविजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. तसेच २०२४ नंतर सलग दुसऱ्यांदा हा किताब जिंकण्याचा मान भारतीय संघाने मिळवला. घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद २५५ धावा केल्या. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.

भारतीय डावात संजू सॅमसनने महत्त्वाची खेळी करत ४६ चेंडूत नाबाद ८९ धावा केल्या. त्याने आपल्या डावात ५ चौकार आणि ८ षटकार लगावले. सलामीवीर अभिषेक शर्माने १८ चेंडूत ५२ धावा करत वेगवान सुरुवात करून दिली. ईशान किशनने २५ चेंडूत ५४ धावांचे योगदान दिले. शेवटच्या टप्प्यात शिवम दुबेने ८ चेंडूत २६ धावा करत संघाची धावसंख्या २५० च्या पुढे नेली. न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने तीन गडी बाद केले.

२५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १९ व्या षटकात १५९ धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराहने चार षटकांत १५ धावा देत चार गडी बाद केले. अक्षर पटेलने तीन बळी घेत गोलंदाजीत मोलाची साथ दिली.

उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला मालिकावीर घोषित करण्यात आले.

या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द आणि संघभावना देशासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या जल्लोषात भारतीय संघाने विश्वचषक उंचावला. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवानंतर याच मैदानावर भारताने विश्वविजेतेपद जिंकत चाहत्यांना आनंदाची भेट दिली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??