आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

दहावीचा भूगोलाचा पेपर ठरल्याप्रमाणेच होणार! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन

दहावीचा भूगोलाचा पेपर ठरल्याप्रमाणेच होणार! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन 

सोलापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दहावीच्या भूगोल विषयाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेमुळे परीक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही. असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (पुणे बोर्ड) स्पष्ट केले आहे , उद्याचा भूगोलाचा पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी कोणताही संभ्रम मनात न ठेवता परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील परीक्षा केंद्राची ‘स्ट्राँग रूम’ फोडून अज्ञात चोरट्यांनी भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांचा एक गठ्ठा लंपास केला. आज सकाळी साडेआठच्या सुमारास जेव्हा अधिकारी स्ट्राँग रूमजवळ पोहोचले, तेव्हा कुलूप कापल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या शाळेत ६४ सीसीटीव्ही कॅमेरे असूनही घटनेच्या वेळी ते बंद असल्याने खळबळ उडाली आहे.

​या गंभीर हलगर्जीपणाची दखल घेत प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले आणि शाळेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

​”प्रश्नपत्रिका चोरीला गेल्या असल्या तरी ‘पेपर फूट’ झाल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. बोर्डाकडे आपत्कालीन स्थितीसाठी राखीव प्रश्नपत्रिका संच उपलब्ध असतात. त्यामुळे उद्याची परीक्षा रद्द होणार नाही. विद्यार्थ्यांनी शांतचित्ताने आणि आत्मविश्वासाने पेपर द्यावा. असे पुणे बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले

सोशल मीडियावर पेपर पुढे ढकलल्याच्या किंवा रद्द झाल्याच्या अनेक अफवा पसरू शकतात. अशा कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. आपल्या पाल्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगावे. उद्याची परीक्षा ही अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडेल, याची खात्री प्रशासनाने दिली आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??