आपला जिल्हाताज्या घडामोडी

समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाच्या वतीने “अमेरिका- इस्त्रायल-इराण युद्धाचे परिणाम ” या विषयावर डॉ.श्रीराम पवार यांचे व्याख्यान 

समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाच्या वतीने “अमेरिका- इस्त्रायल-इराण युद्धाचे परिणाम ” या विषयावर डॉ.श्रीराम पवार यांचे व्याख्यान 

इचलकरंजी:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

औद्योगिक क्रांतीची चाके इंधनावर चालत असतात. कोळसा,तेलावर भांडवली व्यवस्था अवलंबून असते.ऊर्जास्त्रोतांवरचे नियंत्रण हेच भांडवलशाहीचे मुख्य भांडवल आहे. त्यातूनच अमेरिकेला पश्चिम आशियाची रचना युद्धखोरीतून बदलायची आहे. मात्र शांततेची मागणी जगभर सुरू आहे.अमेरिकेसह अन्य राष्ट्रात कोट्यावधी लोक युद्धाच्या विरोधात रस्त्यावर येत आहेत. आता हे युद्ध थांबले तरीही त्याचे विध्वंसक परिणाम पुढील वर्षभर भोगावे लागतील. शेती,खते, वस्त्रोद्योग, तेल,कोळसा, निर्यात या साऱ्यावर त्याचे विपरीत परिणाम होतील. महागाईचा दर अधिक वाढेल.जगाचा जीडीपी एक टक्क्याने कमी होण्याची शक्यता आहे. हवेतून बॉम्ब टाकून कोणतीही राजवट बदलता येत नसते हा धडा या युद्धाने दिलेला आहे. त्यातून सर्वांनीच बोध घेतला पाहिजे,असे मत जेष्ठ पत्रकार व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे ख्यातनाम अभ्यासक डॉ.श्रीराम पवार यांनी व्यक्त केले ते समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ” अमेरिका- इस्त्रायल-इराण युद्धाचे परिणाम ” या विषयावर बोलत होते.सध्या युद्धज्वराच्या परिस्थितीमुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक राजकीय, सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक प्रश्न जगभर निर्माण झालेले आहेत.या पार्श्वभूमीवर या व्याख्यानाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते.डॉ. भारती पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांच्या परिचय करून दिला.

डॉ.श्रीराम पवार म्हणाले,कोणत्याही युद्धात तुमच्याकडे नुकसान सोसण्याची ताकद किती याचे महत्त्व मोठे असते. अमेरिकेचे पारडे जड असूनही इराणची नुकसान सहन करण्याची क्षमता अफाट आहे. अमेरिकेची पत या युद्धाने खालावलेली आहे. युद्ध नको नको म्हणत अमेरिका युद्ध करते ही ट्रम्प यांची मनमानी आहे. युद्धाद्वारे सत्ताबदल करून अमेरिका धार्जिणी राजवट त्यांना हवी आहे. पहिल्याच दिवशी इराणच्या सर्वोच्च नेत्यांवर व अधिकाऱ्यांवर मोठा हल्ला करूनही अमेरिकेला यश मिळवता आलेले नाही. याचे कारण इराणची व्यवस्था बळकट आहे ती खामेनी गेल्याने सहज बदलणारी नाही. अमेरिका व इजरायलचे प्रतिकाराचे अंदाज चुकले. इराणचे नेतृत्व संपवल्याने अनेक मोठे प्रश्न तयार झालेले आहेत. सैन्य उतरवून इराण जिंकणे अमेरिकेला शक्य नाही. कारण इराणचा भूगोल अमेरिकेसाठी अवघड आहे. म्हणूनच हे युद्ध अजून दीर्घकाळ चालेल असे वाटत नाही. त्यासाठी वाटाघाटीतूनच मार्ग काढावा लागेल. अमेरिका युद्धात गुंतून राहणे हे चीनच्या फायद्याचे आहे. या युद्धात भारताने अमेरिका- इस्त्राईलकडे झुकल्यासारखे दिसणे हे हितावह नाही.खामेनी यांच्यावरील हल्ला, निष्पाप मुलींच्या शाळेवरील हल्ला याचा आपण निषेध लगेच करायला हवा होता तो केला नाही. त्यामुळे युद्धात मध्यस्थी करावी असे आपण वागलेलो नाही. डॉ.पवार यांनी आपल्या भाषणामध्ये हे युद्ध, त्याची कारणे, आंतरराष्ट्रीय राजकारण ,त्याचे संभाव्य परिणाम यांचे अतिशय सखोल विश्लेषण केले. श्रोत्यांच्या प्रश्नांना व शंकांना उत्तरेही दिली.

अध्यक्षीय समारोपात डॉ. चौसाळकर म्हणाले, या युद्धाचे परिणाम जागतिक अर्थकारणावर मोठ्या प्रमाणात होतील. एक दोन आठवड्यामध्ये युद्ध थांबवले जाईल. इराणचे अनेक प्रक्षेपास्त्रे तळ नष्ट झाले असले तरी त्यांच्याजवळ अजूनही मोठी क्षमता आहे. अमेरिकेचा प्रयत्न इराणचे संरक्षण व इतर उद्योग नष्ट करण्याचा आहे. त्यामुळे हे युद्ध जगावर अनेक प्रकारची संकटे आणणारे ठरेल. या व्याख्यानास इचलकरंजी व परिसरातील जुन्या संस्था अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले. 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??