उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के; दिल्ली-एनसीआरसह जम्मू-काश्मीरमध्ये घबराट

उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के; दिल्ली-एनसीआरसह जम्मू-काश्मीरमध्ये घबराट
नवी दिल्ली:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
उत्तर भारतासह दिल्ली-एनसीआरच्या परिसरात शुक्रवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रात्री ९:४५ ते ९:५० च्या सुमारास अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.९ इतकी मोजण्यात आली असून, त्याचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये जमिनीखाली १५० किलोमीटर खोलीवर होते.
दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबाद या शहरांमध्ये भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, बहुमजली इमारतींमधील पंखे, झुंबरे आणि घरातील भांडी जोरात हलू लागली. विशेष म्हणजे दिल्लीत पाऊस पडत असतानाच हे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये अधिकच गोंधळ उडाला. धक्के जाणवताच लोक आपापल्या घरांतून आणि सोसायट्यांतून बाहेर पडून मोकळ्या मैदानात जमा झाले. अनेकांनी सोशल मीडियावर घरामध्ये वस्तू हलत असल्याचे व्हिडिओ शेअर करत आपापल्या भागातील परिस्थितीची माहिती दिली.
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, पूंछ आणि उधमपूर या भागांतही भूकंपाची तीव्रता जास्त होती. याशिवाय पंजाबमधील चंदीगड, लुधियाना आणि हरियाणा, राजस्थान, उत्तराखंडच्या काही भागांतही जमीन हादरल्याचे वृत्त आहे. केंद्र अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात असले तरी, त्याचा आवाका मोठा असल्याने भारत, पाकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांनाही याचे धक्के बसले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप मध्यम स्वरूपाचा असला तरी त्याची खोली जास्त असल्याने तो दूरवर जाणवला. सुदैवाने, या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत कोठेही जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. स्थानिक प्रशासन सध्या परिस्थितीचा आढावा घेत असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



