घायल हूं इसलिए घातक हूं’;उपनेतेपदावरून हकालपट्टीनंतर राघव चड्ढांचा संताप, ‘आप’मधील यादवी चव्हाट्यावर

घायल हूं इसलिए घातक हूं ‘;
उपनेतेपदावरून हकालपट्टीनंतर राघव चड्ढांचा संताप,
नवी दिल्ली:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
आम आदमी पक्षातील (आप) अंतर्गत संघर्षाने आता टोक गाठले असून, राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आणि पक्ष नेतृत्व यांच्यातील वाद उघडपणे समोर आला आहे. राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून चड्ढा यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करत नेतृत्वाला थेट आव्हान दिले आहे. “घायल हूं इसलिए घातक हूं” (जखमी आहे म्हणूनच मी अधिक घातक आहे) या शब्दांत त्यांनी दिलेला इशारा पक्षांतर्गत मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मानले जात आहेत.
पक्षाने गुरुवारी (२ एप्रिल २०२६) राज्यसभेच्या सचिवालयाला पत्र लिहून चड्ढा यांच्या जागी खासदार अशोक मित्तल यांची उपनेतेपदी नियुक्ती केली. इतकेच नव्हे तर, यापुढे चड्ढा यांना पक्षाच्या कोट्यातून संसदेत बोलण्यासाठी वेळ देऊ नये, अशी धक्कादायक विनंतीही पक्षाने केल्याचे समोर आले आहे. या कारवाईनंतर चड्ढा यांनी शनिवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्यावरील आरोपांचा सविस्तर समाचार घेतला. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला ‘स्क्रिप्टेड’ आणि जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान असल्याचे म्हटले आहे.
आपल्या व्हिडिओ संदेशात चड्ढा यांनी विचारले की, “पक्षाने मला नेमकी कधी सूचना दिली होती की मी विरोधी पक्षांच्या ‘वॉकआउट’मध्ये सामील झालो नाही? किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्धच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचे निर्देश मला कधी दिले होते?” चड्ढा यांनी असा दावा केला की, त्यांच्यावर होत असलेले आरोप बिनबुडाचे असून, त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करून वैयक्तिक प्रसिद्धीवर भर दिल्याची टीका केली होती, त्यालाही त्यांनी या व्हिडिओतून प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राघव चड्ढा हे पक्षाच्या मुख्य प्रवाहात दिसत नव्हते. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना मिळालेल्या न्यायालयीन दिलासांनंतरही चड्ढा यांनी बाळगलेले मौन आणि केजरीवाल यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांची अनुपस्थिती यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे, चड्ढा समर्थकांच्या मते, त्यांनी संसदेत महागाई, बेरोजगारी आणि मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवूनही त्यांना जाणीवपूर्वक बाजूला सारले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा केवळ एका पदाचा वाद नसून, आगामी काळात पंजाब आणि दिल्लीच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याचे हे संकेत आहेत. राघव चड्ढा यांनी कोणत्याही दबावापुढे झुकणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने, पक्ष आता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार की हा वाद सामोपचाराने मिटणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नवीन उपनेते अशोक मित्तल यांनी हा बदल ‘नियमित संघटनात्मक प्रक्रिया’ असल्याचे म्हटले असले तरी, चड्ढा यांचा आक्रमक अवतार पाहता ‘आप’मध्ये मोठी फूट पडण्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे



