आपला जिल्हाताज्या घडामोडी

खिद्रापूरच्या सुपुत्राची भारतीय सैन्यात मोठी झेप डॉ. वरद पाटील यांची ‘मेजर’ पदी नियुक्ती

खिद्रापूरच्या सुपुत्राची भारतीय सैन्यात मोठी झेप डॉ. वरद पाटील यांची ‘मेजर’ पदी नियुक्ती

शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

प्राचीन लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावचे सुपुत्र डॉ. कॅप्टन वरद पाटील यांची भारतीय सैन्य दलात ‘मेजर’ पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे केवळ खिद्रापूरच नव्हे, तर संपूर्ण शिरोळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैनिक टाकळी परिसरातील हा तरुण आता देशसेवेत वरिष्ठ अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार असल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डॉ. वरद पाटील यांच्या यशाचा पाया त्यांच्या शालेय जीवनातच रचला गेला होता. त्यांचे माध्यमिक शिक्षण केंद्र सरकारच्या ‘कोडगू सैनिक स्कूल’ (कर्नाटक) येथे झाले, जिथे त्यांना शिस्त आणि देशप्रेमाचे बाळकडू मिळाले. त्यानंतर त्यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘आर्मड फोर्स मेडिकल कॉलेज’ (AFMC) मधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि ते भारतीय सैन्य दलात डॉक्टर म्हणून रुजू झाले.

त्यांच्या सैन्य दलातील प्रवासाची सुरुवात पुणे येथील खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ‘लेफ्टनंट’ पदावरून झाली. त्यानंतर पदोन्नती मिळाल्यावर त्यांनी ‘कॅप्टन’ म्हणून आसामसारख्या सीमेवरील आणि आव्हानात्मक भागात सलग तीन वर्षे सेवा बजावली. तेथील कठीण परिस्थितीत त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या याच निष्ठेची आणि कर्तव्याची दखल घेत भारतीय सैन्य दलाने त्यांची ‘मेजर’ या वरिष्ठ पदावर नियुक्ती केली आहे.

एका ग्रामीण भागातील युवकाने जिद्दीच्या जोरावर सैनिक स्कूल ते ‘मेजर’ पदापर्यंत मारलेली ही मजल तरुणांसाठी मोठी प्रेरणादायी ठरली आहे. डॉ. वरद पाटील यांच्या या यशाबद्दल खिद्रापूर, शिरोळ तालुका आणि परिसरातील आजी-माजी सैनिक, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या या यशामुळे शिरोळ तालुक्याचा ‘सैनिकांचा समृद्ध वारसा’ अधिक संपन्न झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??