विमानाची धडक, पॅराशूट फाडले; आकाशात ४४ वर्षीय महिलेच्या मिरेकल सर्व्हायव्हल’चा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओ
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
विमानाची धडक, पॅराशूट फाडले; आकाशात ४४ वर्षीय महिलेच्या मिरेकल सर्व्हायव्हल’चा व्हिडीओ व्हायरल
ऑस्ट्रियातील आल्प्स पर्वतावर एक अत्यंत थरारक आणि जीवघेणी घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी झेल आम सी (पिंझगाऊ) येथील श्मिटेनहोहे पर्वताच्या परिसरात आकाशात उडणाऱ्या एका ४४ वर्षीय महिला पॅराग्लायडरला टिरोल येथील २८ वर्षीय तरुणाने नियंत्रित करत असलेल्या लहान विमानाने (सेसना १७२) जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत विमानाच्या प्रोपेलरने महिलेच्या पॅराग्लायडरचे तुकडे तुकडे केले होते, तरीही त्या महिलेने दाखवलेल्या असामान्य धैर्यामुळे आणि समयसूचकतेमुळे तिचा जीव थोडक्यात वाचला आहे.
या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘sab_thi’ या अकाउंटवरून व्हायरल झाला असून, त्यात धडकेच्या अगदी आधीचे क्षण कैद झाले आहेत. अपघाताच्या वेळी ४४ वर्षीय महिला पॅराग्लायडर पिझेनडॉर्फजवळील पिंझगाऊर हट भागातून शांतपणे सरळ उडत होती. मात्र, त्याच वेळी ग्लेमटाल खोऱ्याकडून वळणाऱ्या २८ वर्षीय पायलटला हवेत नियंत्रण राखता आले नाही आणि त्याने मागून येऊन पॅराग्लायडरला धडक दिली. धडकेमुळे पॅराग्लायडर निकामी झाल्याचे लक्षात येताच, त्या अनुभवी महिलेने तातडीने आपले ‘राखीव पॅराशूट’ सक्रिय केले आणि ती जवळच्याच एका वनमार्गावर सुखरूप उतरली.
या अपघाताबाबत आता तांत्रिक आणि कायदेशीर तपास सुरू आहे. ऑस्ट्रियन आल्पाइन पोलिसांच्या मते, हवाई क्षेत्रात काही स्पष्ट नियम असतात. नियमांनुसार, मोटर असलेल्या विमानाने नेहमी मोटर नसलेल्या विमानाला (पॅराग्लायडर) मार्ग मोकळा करून दिला पाहिजे. २८ वर्षीय पायलट हा अपघात का टाळू शकला नाही, याचा तपास सुरू आहे. सुदैवाने, पॅराग्लायडर महिलेला केवळ किरकोळ दुखापत झाली असून तिने स्वतःच वैद्यकीय उपचार घेतले आहेत, तर विमानात पॅराग्लायडरचे अवशेष अडकलेले असतानाही पायलटला आपले विमान सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले आहे.
झेल आम सी विमानतळाचे व्यवस्थापकीय संचालक फ्लोरियन शेट यांनी स्पष्ट केले की, हे हवाई क्षेत्र ‘पूर्णपणे खुले’ (ओपन एअरस्पेस) आहे आणि तिथे उड्डाणावर कोणतेही कडक निर्बंध नाहीत. अपघाताच्या वेळी त्या महिलेने स्वतःच चित्रीकरण केल्यामुळे ही दुर्मिळ घटना जगासमोर आली आहे. पोलीस हेलिकॉप्टरच्या पथकाने त्या महिलेला सुरक्षितपणे विमानतळावर आणले असून, या ‘मिरेकल सर्व्हायव्हल’ची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.




