आपला जिल्हाक्राईम न्युजताज्या घडामोडी

पेठवडगावात भर रस्त्यात पतीने केला पत्नीचा कोयत्याने वार करून निर्घृण खून 

क्राईम न्यूज : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

पेठवडगावात भर रस्त्यात पतीने केला पत्नीचा कोयत्याने वार करून निर्घृण खून 

​पेठवडगाव :शहरातील मुख्य बाजारपेठेत आणि एसटी बस स्थानकाच्या पाठीमागील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर बुधवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार कोयत्याने सपासप वार करून तिचा निर्घृण खून केला. भर पावसात आणि नागरिकांच्या डोळ्यांदेखत घडलेल्या या क्रूर हत्याकांडामुळे संपूर्ण पेठवडगाव शहर आणि कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. या हल्ल्यात अमृता दीपक कांबळे (वय ३०, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात कमालीची घबराट आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

​ मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत अमृता कांबळे आणि संशयित आरोपी पती दीपक लाडू कांबळे (वय ३५, रा. सावर्डे) यांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पती दीपक हा अमृता यांच्यावर संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यात सातत्याने तीव्र कौटुंबिक वाद होत होते. या घरगुती वादाला कंटाळून अमृता या कायदेशीर सल्ला घेण्यासाठी बुधवारी दुपारी एसटी बस स्थानकाच्या पाठीमागील एका व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये एका वकिलांना भेटण्यासाठी आल्या होत्या.

​अमृता वकिलांकडे गेल्याची माहिती मिळताच संशयित दीपक कांबळे देखील त्या ठिकाणी पोहोचला. तिथे दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. राग अनावर झाल्याने दीपकने स्वतःजवळ आणलेला धारदार कोयता काढून भररस्त्यात अमृता यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. भर पावसात सुरू असलेला हा रक्तरंजित थरार पाहून काही धाडसी नागरिकांनी पुढे येत हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, “ही माझी पत्नी आहे, कोणीही मध्ये पडू नका,” अशी धमकी देत आणि लोकांना धक्काबुक्की करत दीपकने अमृता यांच्यावर सपासप वार केले. डोक्यावर आणि मानेवर झालेल्या गंभीर जखमांमुळे अमृता या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​या थरारक घटनेपूर्वी आरोपी दीपक कांबळे याने आपल्या मोबाईलवर ‘आज माझा तर शेवट, तुझा तर शेवट’ असा अत्यंत धक्कादायक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवला होता, अशी माहिती समोर आली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी कोयत्यासह घटनास्थळावरून तातडीने पसार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

​पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे, हवालदार आबासाहेब पाटील, श्रीकांत दाभोळकर, भूषण शेटे, काकासाहेब स्वामी, महेश गायकवाड, अनिल आष्टेकर आणि लखन सावंत यांच्या पथकाने घटनास्थळाचा तातडीने पंचनामा केला. कोल्हापूरहून फॉरेन्सिक लॅबच्या विशेष पथकालाही पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे तांत्रिक पुरावे संकलित केले आहेत. अमृता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

​वडगाव पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार संशयित पती दीपक कांबळे याच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. भर बाजारात आणि गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या या अमानुष कृत्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??