जिओच्या सेवेवर बहिष्कारास्त्र*

जिओच्या सेवेवर बहिष्कारास्त्र*
एन. वाय. नवा भारत न्यूज / शिरोळ:
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नांदणी येथील महादेवी हत्तीणीला गुजरात येथील अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पामध्ये हलवण्यात आले.
मात्र या घटनेचा निषेध करण्याकरिता नांदणी व परिसरातील अनेक नागरिकांनी जिओच्या सेवेवर बहिष्कार घालण्याचा सामूहिक निर्णय घेतला असून अनेक लोकांनी आपले जिओ कंपनीचे सिमकार्ड इतर कंपनीमध्ये पोर्ट करण्याचा धडाका लावलेला आहे. याबाबतचे अनेक कॉल रेकॉर्ड्स समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. आपल्या प्रिय हत्तीणीच्पा वियोगामुळे दुःखी झालेल्या नागरिकांनी जिओच्या सेवेला नाकारले आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी कंपन्यांनीदेखील आपल्या कंपन्यांची सेवा देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.
एकंदरीतच जनभावना लक्षात घेता या निषेधस्त्राचे पडसाद येणाऱ्या काळातही मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शकतात. जिओ व पर्यायाने अंबानी यांच्या सर्व उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे सत्र सध्या जोरकसपणे सुरू झालेले दिसून येत आहे.जनमानसाने घेतलेल्या या पवित्र्यामुळे येणाऱ्या काळात या कंपनीवर काय कसा व किती परिणाम होतो हे नक्कीच पाहण्याजोगे आहे.
समाजमाध्यमावर या घटनेची प्रतिक्रिया देताना अनेक लोकांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे काही लोकांनी प्राडासारख्या कंपनीला कोल्हापूरने झुकवले तर हा निर्णयही बदलला जाऊ शकतो असा आशावाद व्यक्त केलेला आहे तर ; याच बाबतीत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा प्रयत्नही जोरात सुरू आहे हत्तीने दिलेली सेवा तिची लोकांत असणारी लोकप्रियता आणि तिच्या वियोगामुळे दुःखी झालेले नागरिक आता आपल्या तीव्र भावना समाज माध्यमातून व्यक्त करताना आहेत.