दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्यातर्फे खांडेकर, जनाबाई पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचे आवाहन

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्यातर्फे खांडेकर, जनाबाई पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचे आवाहन
कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने देण्यात येणा-या राज्यस्तरीय वि. स. खांडेकर आणि जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन लेखक, प्रकाशकांना करण्यात आले आहे. २०२५ या वर्षात प्रसिद्ध झालेली पुस्तके पाठवण्याची मुदत ०५ एप्रिल २०२६ आहे. जनाबाई पुरस्कार फक्त कवयित्रींसाठी आहे. ज्या कवयित्रींनी रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवली आहेत त्यांनी जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याची आवश्यकता नाही.
सातारा येथील कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर यांच्यामार्फत वडिल प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ वि. स. खांडेकर पुरस्कार आणि आई श्रीमती कमल मनोहर कोपर्ड यांच्या स्मरणार्थ जनाबाई पुरस्कार देण्यात येणार आहे. वि. स. खांडेकर पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून पहिला पुरस्कार संग्राम गायकवाड यांना ‘मनसमझावन’ या कादंबरीसाठी तर दुसरा पुरस्कार अमोल पालेकर यांच्या ‘ऐवज एक स्मृतिबंध ‘ साठी देण्यात आला होता. खांडेकर पुरस्कारासाठी कथा, कादंबरी, ललित आणि आत्मकथन या वाड्.मय प्रकारातील पुस्तके पाठवता येतील. जनाबाई पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून पहिला पुरस्कार प्रज्ञा दया पवार यांना ‘ हिल्लोळ हरवून आतबाहेरचा’ या संग्रहासाठी देण्यात आला होता.
दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे आहे. ०१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती पुढील पत्त्यावर दि. ०५ एप्रिल, २०२६ पर्यंत पाठवाव्यातः दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, ६, स्मृती अपार्टमेंट, ए वॉर्ड, बाबूजमाल रोड, कोल्हापूरः ४१६००२



