स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील – सहकारातील समाजवादी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील – सहकारातील समाजवादी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

शिरोळ तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, सहकार, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा अनेकविध सर्वांगीण विकासासाठी हातभार लावणारे, एका सामान्य कुटुंबात जन्मूनही असामान्य कार्य करणारे, भीष्माचार्य अर्थात एक अढळ दीपस्तंभ, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी आमदार, सहकार महर्षी, स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील होत. ९४ व्या वर्षापर्यंतही असणारा कामाचा धडाका, तरुणांना लाजवेल अशी चपळता, एखाद्याच्या कामाबद्दलची तळमळ आणि तत्परता, प्रचंड स्मरणशक्ती, विविध क्षेत्रातील घडामोडींचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजेच स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील साहेब होते. साहेबांच्या विचारांचा जागर करण्यासाठी स्व. सा. रे. पाटील साहेबांचे जीवन कार्य छोट्याच्या लेखात सामावणे शक्यच नाही. आठवणीतील साहेब कसे होते? याचा आढावा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
साहेबांचा जन्म शिरोळ तालुक्यातील जांभळी या गावी सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यामुळे त्यांनी शेतीची आवड जपली. आपल्या वडिलांना शेती कामांमध्ये सुमारे १३ वर्षे त्यांनी मदत केली. त्यांच्या वडिलांनी शेतीमध्ये राखलेली स्वच्छता आणि नीटनेटकेपणा त्यांना भारावून टाकणारा ठरला. त्याची त्यांना सवयच लागली. त्यांनी हा गुण आयुष्यभर अंगीकारला. इचलकरंजी नगरपालिकेच्या नाक्यावर त्यांनी कारकुनाची नोकरी केली. त्यानंतर शिरोळ तालुका खरेदी-विक्री संघाचा मॅनेजर म्हणून जवळपास ११ वर्षे नोकरी केली. या नोकरीचा फायदा त्यांना राजकीय जीवनासाठी झाला. या नोकरीच्या निमित्ताने त्यांनी सायकलवरून शिरोळ तालुका पिंजून काढला. त्यामुळे प्रत्येक गावांमध्ये त्यांची चांगली ओळख निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या जिभेवर त्यांचे नाव रुळले. याच दरम्यान संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. या कालावधीत त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला. महात्मा गांधींच्या विचारांबरोबरच ते समाजवादाकडेही आकर्षिले गेले.
स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याने साने गुरुजी, मधु दंडवते, जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे, सदानंद वर्दे, मोहन धारिया अशा समाजवादी विचारसरणीच्या मोठ्या लोकांच्या सहवासामुळे त्यांच्यात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही वृत्ती आली. त्यांनी ती आयुष्यभर टिकवून ठेवली. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४६ आली त्यांनी जांभळी विकास संस्थेची स्थापना करून सहकारात पाऊल टाकले.
१९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने विधानसभेची उमेदवारी त्यांना देण्यात आली. काँग्रेसचे मोठे नेते दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. प्रचारासाठी खर्च करण्याची कुवतही नव्हती. तेव्हा हमाल म्हणून काम करणाऱ्यांनी स्वखर्चाने गावोगावी प्रचार केला. एस. एम. जोशी यांनी प्रचारा वेळी ‘एक मत द्या आणि एक रुपयाही द्या’ असा प्रचार केला. डॉ. पी. बी. पाटील यांनीही यावेळी प्रचार केला. साहेबांनी या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. पाच वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी शासनाचा जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि शिरोळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला. मात्र मोठे काम करूनही १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
या पराभवानंतर त्यांनी विधायक कार्याला सुरुवात केली. जांभळी येथे सहकारी तत्त्वावर लिफ्ट इरिगेशन प्रकल्प राबवून शेतीला बारमाही पाणी मिळवून दिले. १९६७ च्या निवडणुकीत त्यांचा पुन्हा पराभव झाला. त्यानंतर खचून न जाता त्यांनी सहकारी तत्त्वावर शिरोळ तालुका दुध संघाची स्थापना केली. सहकाराच्या माध्यमातून पोल्ट्री फार्म काढले. याचबरोबर कोल्हापूर येथे ‘इंद्रधनुष्य’ नावाचे दैनिकही सुरू केले. यानंतर साखरेची एजन्सी, जयसिंगपूर येथे तेलाची मिलही काढली. पण स्पर्धेत त्यांचा कोठेच टिकाव लागला नाही. कोल्हापूर जिल्हा भूविकास बँकेचे अध्यक्ष तसेच जिल्हा बँकेची जबाबदारीही त्यांनी पार पाडली.
आपल्यासारख्या विचारांची चांगली माणसे एकत्र घेऊन साहेबांनी शिरोळ मध्ये साखर कारखाना काढण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला. १९६९ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी कारखाना काढण्याची परवानगी मिळवून दिली. १९७१ मध्ये १२५० मेट्रिक टनाचे दररोज ऊस गाळप करण्याची क्षमता असलेला कारखाना सुरू झाला. मा. दत्ताजीराव कदम हे पहिले चेअरमन तर सा. रे. पाटील साहेब हे व्हाईस चेअरमन झाले. १९८० पासून ते अखंडितपणे त्यांच्या मृत्यूपर्यंत चेअरमन राहिले.
कारखान्याचा निसर्गरम्य परिसर आणि येथील विविध झाडे व नर्सरी पाहण्यासाठी अनेकजण रोज येत असतात. निसर्गाच्या आणि कलात्मकतेच्या बाबतीत कारखाना एका वेगळ्या उंचीवर आहे.
या दरम्यानच्या काळात १९८२ मध्ये जीवनावश्यक वस्तू माफक दरात ग्राहकांना मिळाव्यात यासाठी कारखाना स्थळावर श्री दत्त भांडारची स्थापना केली. 42 वर्षात दत्त भांडारने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. दत्त भांडारचे झुणका-भाकर केंद्रही आज राज्यात लौकिकपात्र ठरले आहे.
राजकारण, निवडणुकापेक्षाही त्यांचा मूळचा पिंड हा सेवा दलाचे सामाजिक काम आणि समाजवादी विचारसरणीशी घट्ट राहिला. सातवी पर्यंतचे शिक्षण झाले असले तरी प्रचंड वाचनामुळे जगातील सगळ्याच घडामोडींची त्यांना माहिती होती. आपल्याकडील ज्ञान ते सदैव अपडेट करीत राहिले. त्यांचे शिक्षण स्वातंत्र्य चळवळीने आणि महात्मा गांधींच्या विचाराने भारावून गेलेल्या वातावरणात प्रत्यक्ष जीवनाच्या विद्यापीठातच झाले. या अनुभवाच्या, शिक्षणाच्या जोरावर त्यांनी राज्य, राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थावर धडाडीने काम केले. निवडणुकीत त्यांनी कित्येकदा यशाबरोबरच अपयशही पचवले. एक लोकसभाही ते हरले. पण अपयशाने खचून न जाता ते नेहमी कामात व्यस्त राहिले. विकास आणि समाजहित साधूनच राजकारणाचा त्यांनी प्रयत्न केला. राजकारण करताना लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी विधायक कामे असोत किंवा कोणतीही कामे असोत, निष्ठा ठेवून काम करण्याचे ठरवले की ते पूर्ण करता येते अशी त्यांची स्वतंत्र विचारसरणी बनली. १९९० पर्यंत अपक्ष आणि पक्षाच्या माध्यमातून त्यांनी काम केले. १९९० नंतर काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या सामील होऊन काम करत राहिले. १९९९ मध्ये ते विधानसभेत निवडून आले. २००४ च्या निवडणुकीत यांनी अर्ज भरला नाही. मात्र २००९ मध्ये त्यांनी आमदारकी पुन्हा मिळवली. या आमदारकीच्या कालावधीत त्यांनी विकासकामांच्या जोरावर शिरोळ तालुक्या मध्ये विकासाची गंगा आणली. या काळामध्ये त्यांचा मा. शरदचंद्रजी पवार, विलासराव देशमुख, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, पतंगराव कदम आदी काँग्रेसमधील मोठ्या लोकांशी संपर्क आला. त्यांच्या माध्यमातूनही परिसराच्या विकासाला हातभार लागला.
मा. यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, विखे पाटील, तात्यासाहेब कोरे अशा ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कातूनही लोकोपयोगी कामे केली. 70 वर्षांपेक्षा जास्त काळ साहेबांनी कारखान्याशी, त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांशी आणि परिसरातील लोकांशी एकनिष्ठ राहत त्यांच्या प्रगतीसाठी काम केले. अनेक संस्थांमध्ये तज्ञ संचालक, संचालक, अध्यक्ष, मानद सचिव, विश्वस्त, कार्याध्यक्ष अशा विविध पदावरतीही त्यांनी काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
कारखान्याचा विस्तार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत प्रतिदिन ७००० मेट्रिक टन ऊस गाळप, देशातील पहिला सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल निर्मिती, कंपोस्ट खताची निर्मिती केली. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे आरोग्य केंद्र, पॉलिटेक्निक कॉलेज, हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक निर्मितीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. तसेच तालुक्यातील अनेक संस्थांचे ते मार्गदर्शक म्हणूनही काम पाहिले. विविध गावामध्ये २० पाणीपुरवठा योजना सुरू करून सुमारे ४० हजार एकर जमीन पाण्याखाली आणून परिसराचे नंदनवन केले.
शिरोळ तालुका आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणून आज श्री दत्त कारखान्याकडे पाहिले जात आहे. कारखान्याला व्यवस्थापनाचे देश पातळीवरील 68 पुरस्कार तर साहेबांनाही त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये पुण्याच्या टिळक विद्यापीठाची डी.लिट. पदवी, आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार, साहेबराव सातकर सहकार विभूषण पुरस्कार, डॉ. आण्णासाहेब शिंदे कृतज्ञता पुरस्कार, यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना राज्यस्तरीय पुरस्कार, कार्यक्षम आमदार पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, कै. नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानचा समाज वैभव पुरस्कार व समर्पित कार्यकर्ता पुरस्कार असे अनेक पुरस्कार आणि सन्मान त्यांना प्राप्त झाले.
आपल्या ७० वर्षांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविला आहे. समाजवादी विचारांची जोपासना करत काँग्रेसची विचारधाराही तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. साधे जीवन, साधे राहणीमान असले तरी आपली वैचारिक बैठक आणि आधुनिक, विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी काम केले. कर्मकांड, अंधश्रध्दा यांना न मानता माणसाच्या उन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या विचारांना त्यांनी स्वत: आत्मसात करुन नंतर त्याचा आदर्श इतरांसमोर ठेवला. व्यसनाला त्यांनी आपल्या जीवनात थारा दिला नाही. त्यामुळे ९४ व्या वर्षीही ते तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने सतत कार्यमग्न राहिले. आपल्या कामाप्रती निष्ठा, सचोटी, नवनविन गोष्टी शिकण्याची तळमळ, विकासाचा ध्यास, कष्ट करण्याची तयारी, यश मिळेपर्यंत पाठलाग, अचूक निर्णय घेण्याची क्षमता, काटेकोर नियोजन, कामाचे व वेळेचे योग्य व्यवस्थापन, लोकसंग्रह करण्याची आवड, कला आणि निसर्गाबद्दल असणारे प्रेम, ठाम वैचारिक भूमिका, सहकारातून समृध्दीचा विश्वास, राष्ट्रसेवादल आणि समाजवादी विचारांना पुढे घेवून जाण्याची तळमळ अशा कितीतरी गोष्टी स्वर्गीय सा. रे. पाटील साहेब यांच्याकडून आपणाला शिकण्यासारख्या आहेत.
प्रगतशील देशांचा साखर, कागद, आसवनी व शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी इस्राएल, ब्रिटन, नॉर्वे, जपान, ऑस्ट्रेलिया, कोरिया, ब्राझील, जर्मनी, स्पेन, डेन्मार्क आदी २१ पेक्षा जास्त देशांचा प्रवास केला. आलेल्या अनुभवाचा फायदा त्यांनी सहकार क्षेत्राला करून दिला. सहकारातल्या या भीष्माचाऱ्यापुढे आदराने नमन करावे लागते. त्यांच्या कामाची प्रेरणा आम्हाला सतत मार्गदर्शन करत राहील आणि दीपस्तंभ बनून ते निश्चितपणे आपल्या सोबत राहतील. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
संजय आप्पासाहेब सुतार, नांदणी. मो. ८६००८५७२०७, कार्यकारी संपादक – मासिक इंद्रधनुष्य- शिरोळ.



