आपला जिल्हाताज्या घडामोडी

३० फूट खोल दरडीत कोसळून गवा रेडा गंभीर जखमी

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील खोदकाम ठरले वन्यजीवांसाठी घातक

३० फूट खोल दरडीत कोसळून गवा रेडा गंभीर जखमी

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील खोदकाम ठरले वन्यजीवांसाठी घातक

पन्हाळा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे शाहूवाडी तालुक्यातील निळे गाव परिसरात वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गालगत करण्यात आलेल्या खोल उत्खननात पडून गवा रेडा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्ग प्राधिकरणाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यातील निळे गावाजवळ रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. या भागालगत दाट जंगल असल्याने गवा, सांबर, रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांची सतत वर्दळ असते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक गवा रेडा जंगलातून रस्ता ओलांडत असताना उत्खनन केलेल्या भागाची खोली लक्षात न आल्याने तो थेट सुमारे तीस फूट खोल दरडीत कोसळला.

या अपघातात गव्याच्या पाठीच्या मणक्याला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली. प्राथमिक तपासणीत पायाला फ्रॅक्चर झाल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. जखमी झाल्यानंतर गवा रेडा जागेवरून उठू शकत नसल्याने तो रात्रभर दरडीतच पडून होता. बुधवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला.

माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी गव्याला बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरडीची खोली आणि अवघड भूभाग यामुळे बचावकार्याला वेळ लागला. शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर विशेष वाहनाच्या मदतीने गव्याला पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली.

दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी हे रत्नागिरी दौऱ्यावर जात असताना त्यांनी घटनास्थळी थांबून पाहणी केली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जखमी गव्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच महामार्गाच्या कामादरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

nynavabharatnews.live

स्थानिक ग्रामस्थांनीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदारांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. रस्त्यालगत खोल उत्खनन करूनही अनेक ठिकाणी संरक्षक कठडे, इशारा फलक किंवा सुरक्षा जाळी उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे वन्यप्राणी तसेच वाहनचालकांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जंगल परिसरातून जाणाऱ्या महामार्गांवर वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित मार्ग, कुंपण आणि प्रतिबंधक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??