दहावीच्या निकालाचा मुहूर्त ठरला; उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल

दहावीच्या निकालाचा मुहूर्त ठरला;
उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल
पुणे: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवारी ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे शिक्षण मंडळ सचिव डॉ. दीपक माळी यांनी आज अधिकृत परिपत्रकाद्वारे ही घोषणा केली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या राज्यातील सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या या परीक्षेला राज्यभरातील २३ हजार ६८३ शाळांमधून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ६५ हजार ७४० मुले, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींच्या संख्येत सुमारे ४ हजारांनी वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर यांसह राज्यातील नऊही विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी दुपारी १ वाजता उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, यंदा बोर्डाने गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल आठ दिवस आधी निकाल लावून मोठी तत्परता दाखवली आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आसन क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव ही माहिती अर्जात भरावी लागेल. mahahsscboard.in, sscresult.mkcl.org, mahresult.nic.in आणि results.digilocker.gov.in या संकेतस्थळांवर गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच निकाल पाहिल्यावर त्याची प्रत विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून घेता येईल. ‘डिजी लॉकर’ ॲपवरही निकाल पाहण्याची आणि डिजिटल गुणपत्रिका साठवून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल किंवा गुणपडताळणी करायची असेल, त्यांच्यासाठी ९ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थी २३ मे पर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करू शकतील. शाळांना विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल त्यांच्या स्वतंत्र लॉगिनवर उपलब्ध करून दिला जाईल. शिक्षण मंडळाच्या या वेगवान निकालामुळे पुढील अकरावी प्रवेश प्रक्रियेला लवकर सुरुवात होण्याची शक्यता आहे.



