आपला जिल्हाताज्या घडामोडी

कोल्हापुरात ‘संयुक्त उपनगर शिवजयंती’चा जागर; व्याख्यान आणि ‘शिवपुत्र शंभूराजे’ महानाट्याचे आयोजन

कोल्हापुरात ‘संयुक्त उपनगर शिवजयंती’चा जागर; व्याख्यान आणि ‘शिवपुत्र शंभूराजे’ महानाट्याचे आयोजन

​कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

राधानगरी रोड येथील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल ते रविवार, १९ एप्रिल २०२६ या कालावधीत राधानगरी रोडवरील सरसेनापती संताजी घोरपडे चौक (क्रशर चौक) येथे हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष भगवान पाटील माजगांवकर यांनी दिली आहे.

​मोटर सायकल रॅलीने होणार प्रारंभ.                             उत्सवाची सुरुवात शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ४:०० वाजता शिवमूर्ती आगमनाने होईल. नवीन वाशी नाका येथून भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात येणार असून याद्वारे मिरवणुकीस प्रारंभ होईल.

​गोव्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांचे व्याख्यान

शनिवारी (दि. १८) सायंकाळी ६:०० वाजता ‘शिवाजी महाराज व गोवा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा राज्याचे समाजकल्याण व पुरातत्व मंत्री नामदार सुभाष फळदेसाई हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समितीच्या सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडेल.

​’शिवपुत्र शंभूराजे’ महानाट्य आणि मान्यवरांची उपस्थिती

रविवार, दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजता समितीच्या महिला सदस्यांतर्फे शिवजन्मकाळ सोहळा साजरा केला जाईल. सोहळ्याच्या सांगता समारंभात सायंकाळी ६:०० वाजता आभास कला अकॅडमी प्रस्तुत ‘शिवपुत्र शंभूराजे’ हे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील महानाट्य सादर होणार आहे.

​या कार्यक्रमास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

​या सोहळ्याचे नियोजन संस्थापक अध्यक्ष शारंगधर वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष भगवान पाटील माजगांवकर, उपाध्यक्ष शिवम सबनीस, सागर गायकवाड, सचिव राजू भोसले आणि खजानिस आनंदा पाटणकर करत आहेत. परिसरातील शिवभक्तांनी या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??